चौकशीसाठी पाकिस्तान तयार   

इस्लामाबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आम्ही कोणत्याही निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीस तयार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पहलगाममधील अलीकडील दुर्घटना सततच्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण असून, जी आता थांबली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडत आहेत. पाकिस्तान कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वाासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खैबर-पख्तुनख्वा येथे एका कार्यक्रमात सांगितले.
 
पहलगाममधील नरसंहारानंतर भारताने सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती देताना काही आक्रमक पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान बिधरला आहे. भारताचे आरोप नाकारतानाच शरीफ यांनी पहलगाममधील हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे. यासोबतच, आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहे, असे सांगत धमकी दिली आहे.पाकिस्तानच्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा, कमी करण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न केला तर त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल. भारताने आमच्या वाट्याचे पाणी थांबवले तर सर्व पर्याय वापरू. जल आमची जीवनदाहिनी असून राष्ट्रीय हितासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजू, असेही त्यांनी म्हटले आहे.संपूर्ण राष्ट्र पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे असून मातृभूमीचा संपूर्ण भाग सुरक्षित ठेऊ. पाकिस्तानी सशस्त्र दलाचे देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी सक्षम आणि पूर्णपणे सज्ज आहेत, असे ते म्हणाले. 

Related Articles